कर्करोगाने बाधित रुग्णांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी एक एकत्रित आधारस्थान उपलब्ध करून देणे हा I-CAN चा उद्देश आहे.
कर्करोगाचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, त्यांच्याप्रमाणे या परिस्थितीतून पूर्वी गेलेल्या किंवा सध्या जात असलेल्या इतरांशी आपल्या अडचणींविषयी आणि भावनांविषयी मोकळेपणे बोलू शकतील, प्रश्न विचारू शकतील असं I-CAN हे व्यासपीठ आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला असेल तर उद्भवणारे प्रश्न केवळ शारीरिक आणि आर्थिकच असतात असं नाही तर भावनिक देखील असतात. या पार्श्वभूमीवर I-CAN अशा कुटुंबीयांना आपल्याप्रमाणेच या व्याधीला तोंड देणाऱ्या इतर रुग्णांकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून अनुभवातून शिकण्याची संधी देईल. अशा सान्निध्याने आणि संवादाने कर्करोगामुळे उद्भवणारे ताण, चिंता आणि नैराश्य दूर करण्यासाठी खूप मदत होते हे जगभरातील अनुभवाने सिद्ध झालेले आहे.
I-CAN च्या माध्यमातून कर्करोग रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आपल्या व्याधीवरील उपचारांसाठी उपलब्ध पर्याय काय आहेत, डॉक्टरांना नेमके काय प्रश्न विचारावेत, इतर नातेवाईकांशी कसा संवाद ठेवावा, उपचारांदरम्यान नेमके काय होऊ शकेल किंवा उपचारांचे इतर शरीरावर होणारे परिणाम काय असतील, तसेच उपचार संपल्यानंतर कोणत्या प्रकारच्या सेवा लागू शकतील आणि त्या कशा मिळवता येतील, अशा अनेक गोष्टींविषयी अधिक माहिती मिळवू शकतील. इतकी सखोल माहिती मिळाल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्करोग उपचार सुरू असताना आपल्या आयुष्यावर आपले नियंत्रण असल्याचा आत्मविश्वास तर मिळेलच, या शिवाय आपण या अवघड प्रवासात एकटे नाही आहोत ही भावना देखील सुखावह असेल.
I-CAN च्या आधार यंत्रणेत अनुभवी कर्करोग उपचार तज्ञ, वैद्यकीय सल्लागार, वैद्यकीय समाजसेवक, मानसोपचार तज्ञ वगैरेंचा समावेश असेल. तसेच आवश्यक असेल तेव्हा कर्करोग रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा त्याच व्याधीने ग्रस्त इतर रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी सुसंवाद व्हावा यासाठी अनुभवी रूग्ण-सहाय्यक मदत करतील.
I-CAN च्या माध्यमातून वेळोवेळी आमंत्रित कर्करोग तज्ञ डॉक्टर्स, परिचारक/परिचारिका, शास्त्रज्ञ, कर्क रोगातून बरे झालेले रुग्ण असे विविध अनुभवी तज्ज्ञ कर्करोगाशी संबंधित अद्ययावत माहिती रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देतील. याबरोबरच रुग्णांना उपचार खर्चाचे व्यवस्थित नियोजन करता यावे म्हणून आर्थिक सल्ला देण्यासाठी अनुभवी व्यक्तीदेखील आमंत्रित केल्या जातील.
I-CAN शी निगडीत स्वयंसेवक रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्याशी सहनशीलतेने गप्पा मारतील, कथा-कादंबऱ्या वाचून दाखवतील किंवा गाणी ऐकवतील, इतकंच नव्हे तर त्यांना विविध छंदांमध्ये गुंतवून ठेवतील. आनंदी कर्करोग रुग्ण वैद्यकीय उपचारांना अधिक चांगल्या रीतीने प्रतिसाद देऊ शकतात हे सिद्ध झालेले आहे.
I-CAN कर्करोग रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी त्यांच्या सोयीनुसार आणि उपलब्धतेनुसार विविध प्रकारे संपर्कात राहील. यात ऑनलाइन संपर्क, फोन तसेच प्रत्यक्ष भेटींचाही समावेश असेल. एकमेकांच्या सोबतीने आपण नक्की विजयी होऊ!